नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; पंतप्रधान, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोसह चक्क…

सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेत मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख झाल्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, यात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतच मंत्री गिरीश महाजनांचाही फोटो असून, त्याखाली त्यांचा थेट पालकमंत्री आणि कुंभपर्व मंत्री असा स्पष्ट उल्लेख आहे.

काही दिवसांपूर्वी कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात आय व्यू एंटरप्रायझेस प्रकाशित या सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेचे प्रकाशन झाले होते. यावेळी मंत्री गिरीश महाजन आणि कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह उपस्थित होते. पुस्तिकेच्या मागील बाजूसही गिरीश महाजन यांचा पालकमंत्री व कुंभपर्व मंत्री असाच उल्लेख दिसून येत आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून यापूर्वीही अनेकदा वाद निर्माण झाला आहे. आता कुंभपर्व पुस्तिकेत थेट पालकमंत्री म्हणून उल्लेख झाल्याने गिरीश महाजन यांच्या नावाची ही चर्चा पुन्हा एकदा जोरदारपणे सुरू झाली आहे. या घटनेमुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या वादाला वेगळंच वळण येणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *