

Indian Navy Sailor Family Death Case : मुंबईच्या कफ परेड परिसरातील नेव्ही नगरमध्ये शनिवारी रात्री एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. भारतीय नौदलातील 34 वर्षीय नाविक पुरनमल शंभूलाल मेहरा, त्याची 28 वर्षीय पत्नी ओमा आणि दोन मुलांचे मृतदेह सरकारी निवासस्थानी आढळून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलीस कसून तपास करत आहेत.
तीन वर्षाचा मुलगा यश आणि अवघ्या दोन महिन्याच्या मुलीचा मृतदेह बेडवर सापडला. तर पुरनमल यांनी गळफास घेतलेला होता. 15 ऑगस्टच्या रात्री कफ परेड पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठवले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, पुरनमलने फाशी घेऊन आत्महत्या केली. तर त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू विष घेतल्याने झाला असावा. मात्र, मृत्यूचं नेमकं कारण समजलं नाही. पोस्टमार्टम आणि फॉरेन्सिक चौकशीनंतरच मृत्यूचं खरं कारण समोर येणार आहे.
श्वास गुदमरला अन्…
घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही. फॉरेन्सिक टीमने अख्ख घर शोधलं. पण घरात विष सापडलेलं नाहीये. जेजे रुग्णालयात झालेल्या पोस्टमार्टमनुसार पुरनमल यांचा मृत्यू फाशीमुळे श्वास गुदमरल्याने झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पण ओमा आणि दोन मुलांचा मृत्यूवर मेडिकल टीमने केमिकल आणि फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतरच निष्कर्ष काढणार असल्याचं म्हटलं आहे.
पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर गेल्या काही काळापासून पुरनमल यांच्या कुटुंबात वैवाहिक वाद होते असं समोर आलं आहे. पुरनमल आणि ओमाचं लग्न चार पाच वर्षापूर्वी झालं होतं. दोघांमध्ये नेहमीच वाद व्हायचे. एक आठवड्यापूर्वी ओमाचे वडील तिला मुंबईवरून गावाकडे घेऊन जायला आले होते. त्यावेळी ओमाला जायचं असेल तर जाऊ शकते. पण ती सोबत मुलांना घेऊन जाऊ शकत नाही, असं पुरनमल याने म्हटल्याचं समोर आलं आहे. पोलीस आता या कौटुंबिक वादाची माहिती घेऊन या आत्महत्येमागच्या कारणाचा शोध घेत आहेत.
वारंवार फोन नंतरही उत्तर नाही
सूत्रांच्या माहितीनुसार, पुरनमलच्या वडिलांनी त्यांना रात्री फोन केला होता. वारंवार फोन केल्यानंतरही कोणतंच उत्तर आलं नाही. त्यानंतर त्यांनी नौदलाच्या कंट्रोल रूमला सूचना दिली. त्यानंतर नौदलाचे अधिकारी पुरनमलच्या सरकारी निवासस्थानी आले. तेव्हा त्यांना कुटुंबातील चारही जणांचा मृत्यू झाल्याचं दिसलं. त्यानंतर नौदलाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कफ परेड पोलिसांना माहिती दिली.
पुरनमल यांचं कुटुंब मूळचं राजस्थानचं राहणारं आहे. पुरनमलचा लहान भाऊही नौदलात तैनात आहे. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी तो मुंबईत आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच शेजारील लोक, नातेवाईक आणि इतरांच्या साक्षी पोलिसांनी नोंदवल्या आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

