

राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. अशातच आता सांगलीतून मोठी बातमी समोर आली आहे. मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीने पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. यावेळी सभापती आणि उपसभापती दोन्ही पदांवर महायुतीने बाजी मारत सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे. विशेष म्हणजे ही निवडणूक बिनविरोध झाली. मागील निवडणुकीत बहुमत असूनही सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपाने यावेळी राजकीय डावपेच यशस्वी करत सत्ता हस्तगत केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सभापती आणि उपसभापती निवडणूक बिनविरोध
सांगलीच्या मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत यावेळी भाजपाने मोठा विजय मिळवला आहे. भाजपाच्या राणी भोरे यांची सभापतीपदी, तर शिवसेना शिंदे पक्षाच्या ललिता शेजुळ यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महाविकास आघाडीकडून कोणताही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली.
महाविकास आघाडीला मोठा धक्का
मागील निवडणुकीत खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने प्रभावी रणनीती आखली होती. त्यावेळी भाजपाच्या काही मित्रपक्षांना आपल्या बाजूने वळवत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात महाविकास आघाडीला यश आले होते. मात्र यंदा चित्र बदलले आहे. या विजयानंतर माजी खासदार संजयकाका पाटलांनी खासदार विशाल पाटलांवर जोरदार निशाणा साधला आहे.
खासदार विशाल पाटील यांची चिंता वाढली
मिरज पंचायत समितीतील परिस्थिती यावेळी पूर्णपणे बदलली आहे. ग्रामविकास विभागाच्या आदेशानंतर सत्तेची समीकरण बदलले असून महाविकास आघाडीच्या बाजूला गेलेला राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे पक्ष ज्यामध्ये विद्यमान उपसभापती हे देखील भाजपाच्या बाजूने गेल्याचे पाहायला मिळालं. या जोरावर नव्या निवडीत भाजपाने सत्ता हस्तगत करत मागील पराभवाचा वचपा काढला आहे. तर महाविकास आघाडीसह खासदार विशाल पाटील यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. आता आगामी काळात विशाल पाटील कोणती नवी राजकीय खेळी करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

