
रिक्षाचालकांवर मराठी भाषेची सक्ती करण्याच्या कारवाईला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने तीव्र विरोध दर्शवला आहे. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस पारसनाथ तिवारी यांनी प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या इशाऱ्यावर आक्षेप घेतला आहे. मराठी भाषा महाराष्ट्रात सर्वांना यायला हवी, मात्र ती जबरदस्तीने लादता कामा नये, असे तिवारी यांचे म्हणणे आहे. १९८९ साली शासनाने पास केलेल्या जीआरमध्ये मराठी भाषेची सक्ती होती, पण तो आजवर लागू झाला नाही.
आता अचानक रिक्षाचालकांवर कारवाई करणे चुकीचे असून, लायसन्स आणि परमिट देणारे अधिकारीदेखील जबाबदार आहेत, असे तिवारी यांनी म्हटले. ते म्हणाले की, ही कारवाई एकतर्फी असून, यामागे केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा उद्देश आहे. गरज पडल्यास रिक्षाचालकांसाठी न्यायालयात दाद मागण्याची तयारी राष्ट्रवादीने दर्शवली आहे. तसेच, महाराष्ट्रात मराठी सक्ती करताना, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मराठीला तिसऱ्या भाषेचा दर्जा देण्याची मागणी करणार असल्याचेही तिवारी यांनी स्पष्ट केले.

