Shoaib Akhtar : वसीम अक्रमच्या मनात माझ्याबद्दल संशय होता, पण तेच इमरान खान असते तर..शोएब अख्तरचा हैराण करणारा दावा

Shoaib Akhtar : वसीम अक्रमच्या मनात माझ्याबद्दल संशय होता, पण तेच इमरान खान असते तर..शोएब अख्तरचा हैराण करणारा दावा

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने एक मोठा दावा केला आहे. “इमरान खान यांच्या नेतृत्वाखाली मला खेळण्याची संधी मिळाली असती, तर टेस्ट क्रिकेटमध्ये मी 400 विकेट काढले असते” असं शोएब अख्तरने म्हटलय. आपल्या पिढीतील सर्वात वेगवान गोलंदाजांमध्ये शोएब अख्तरचा समावेश व्हायचा. त्याने 46 टेस्ट मॅचमध्ये 178 विकेट काढले. 2011 साली भारतात झालेल्या वर्ल्ड कप दरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यावेळचा तत्कालिन कर्णधार शाहिद आफ्रिदीसोबत त्याचे मतभेद झाल्याच्या बातम्या समोर आलेल्या.

‘जियो टीवी’च्या एका कार्यक्रमात शोएब अख्तर सहभागी झालेला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 400 पेक्षा जास्त विकेट्स आहेत. कार्यक्रमात बोलताना शोएबने सांगितलं की, “इमरान खान त्याचा आवडता कॅप्टन होता. त्यांच्या नेतृत्वाखाली खेळण्याची संधी मिळाली असती, तर करिअरवर मोठा परिणाम झाला असता. मी इमरान खान यांच्या आक्रमक नेतृत्वाखाली खेळलो असतो, तर भरपूर काही शिकायला मिळालं असतं. टेस्ट क्रिकेटमध्ये मी 400 विकेट घेतले असते”

कौतुकासोबत दोघांमध्ये मतभेद झाले

रावळपिंडीमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध सामन्यातून शोएब अख्तरने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. हे त्याचं घरचं मैदान होतं. वसीम अक्रम त्यावेळी पाकिस्तानचं नेतृत्व करायचा. शोएब अख्तरच्या डेब्यू बद्दल अक्रमच्या मनात संशय होता. ही योग्य वेळ नाही असं अक्रमच मत होतं. वेळेसोबत दोन्ही वेगवान गोलंदाजांमध्ये संबंध बिघडले सुद्धा. कौतुकासोबत दोघांमध्ये मतभेद सुद्धा झाले.

मैदानाबाहेरही त्याची भरपूर चर्चा

शोएब अख्तर फक्त पाकिस्तानातच नाही, भारतातही लोकप्रिय आहे. शोएब जितकी वर्ष क्रिकेट खेळला तितकच वादांशी सुद्धा त्याचं नातं राहिलं. मैदान तर त्याने त्याच्या वेगवान गोलंदाजीने गाजवलच. पण मैदानाबाहेरही त्याची भरपूर चर्चा व्हायची. भन्नाट वेग ही त्याच्या गोलंदाजीची खासियत होती. म्हणूनच त्याला रावळपिंडी एक्सप्रेस बोलायचे. क्रिकेट मैदानात त्याला काहीवेळा सचिन तेंडुलकरचा विकेट मिळवण्यात यश आलं. पण अनेकदा सचिनने त्याची गोलंदाजी सुद्धा फोडून काढली. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना असला की, सचिन विरुद्ध शोएब लढतीची चर्चा व्हायची. शोएब विरूद्धच्या या लढतीत सचिनने त्याचा क्लास अनेकदा दाखवून दिला. सध्याच हाच शोएब अख्तर क्रिकेट विश्लेषकाच्या भूमिकेत टीव्हीवर दिसतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *