चांदीपुरा व्हायरसचा कहर, 22 मुलांच्या मृत्यूने खळबळ; आरोग्य विभाग अलर्टवर

चांदीपुरा व्हायरसचा कहर, 22 मुलांच्या मृत्यूने खळबळ; आरोग्य विभाग अलर्टवर

गुजरातमधून चिंताजनक बातमी समोर आली आहे. मुसळधार पाऊस सुरू असताना चांदीपुरा व्हायरसचा धोका वाढताना पहायला मिळत आहे. राज्यात आतापर्यंत या विषाणूशी संबंधित 184 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी तपासणीनंतर 35 जणांना चांदीपुरा विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे, तर 11 नमुन्यांचे अहवाल अद्याप समोर आलेले नाहीत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने संपूर्ण आरोग्य यंत्रणा सतर्क केली असून संबंधित सर्व विभागांना दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

22 बालकांचा मृत्यू

गुजरातचे आरोग्यमंत्री प्रफुल पानशेरिया यांनी सांगितले की, ‘सर्व संशयित रुग्णांना चांदीपुरा विषाणूची लागण झालेली नाही. तपासणीत केवळ 35 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत या विषाणूमुळे 22 बालकांचा मृत्यू झाला आहे. सध्या शासकीय रुग्णालयांमध्ये सात संक्रमित मुलांवर उपचार सुरू आहे. तर सहा मुलांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, गांधीनगर, साबरकाठा जिल्ह्यातील हिम्मतनगर, पाटण, राजकोट आणि भावनगर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये मुलांवर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. डॉक्टर रुग्णांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार उपचार करत आहेत. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे रुग्ण एकाच जिल्ह्यातील किंवा गावातील नाहीत, त्यामुळे आरोग्य विभागाच्या पथकांकडून संपूर्ण राज्यात सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनाही राबवल्या जात आहेत.

चांदीपुरा विषाणूवर लस उपलब्ध नाही

आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, चांदीपुरा विषाणूविरुद्ध सध्या कोणतीही विशेष लस किंवा प्रभावी औषध उपलब्ध नाही. त्यामुळे डॉक्टर आणि संशोधकांची विशेष टीम या विषाणूवर लस आणि प्रभावी औषध विकसित करण्यासाठी संशोधन करत आहे. पुढे मंत्र्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता फक्त आरोग्य विभागाने जारी केलेल्या अधिकृत माहितीलाच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. तसेच मुलांमध्ये ताप, उलट्या किंवा इतर गंभीर लक्षणे दिसल्यास विलंब न करता त्याला जवळच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *