

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटीनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या माणसाला आजच्या काळात देखील विचार करायला भाग पाडतात. माणसाने आपलं आयुष्य कसं जगावं? काय करू नये? आणि काय करावं? याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात माणसाचा जर सर्वात मोठा शत्रू कोण असेल तर तो म्हणजे आळस, जे लोक आळशी असतात, असे लोक आपल्या आयुष्यात कधीही प्रगती करू शकत नाहीत, त्यामुळे माणसाने आळसाचा त्याग केला पाहिजे, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल ते काम अतिशय प्रामाणिकपणे आणि आळस न करता पूर्ण केलं पाहिजे, तर आणि तरच तुम्ही प्रगती करू शकता, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे, तसेच माणसाने कधीही दिवसा झोपू नये, असंही चाणक्य म्हणतात. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबदद्ल.
माणसाने दिवसा का झोपू नये? आर्य चाणक्य सांगतात दिवसा झोपण्याचे अनेक तोटे आहेत, त्यामुळे माणसाने कधीही दिवसा झोपू नये. जर तुम्ही दिवसा झोपलात तर तुमचा मौल्यवान वेळ वाया जातो, ज्या वेळेत तुम्ही काही काम करू शकला असतात. त्यामुळे तुमचं नुकसान होतं. जर तुम्ही दिवसा झोपलात तर दिवसभर तुमच्या अंगात आळस राहतो, तुम्हाला आणखी आराम करण्याची तीव्र इच्छा होते. तसेच दिवसा झोप घेणं हे तुमच्या आरोग्यासाठी देखील धोक्याचं आहे. माणसाने कधीही गरज नसताना अधिक झोप घेऊ नये, त्यामुळे तुमची दिनचर्या विस्कळीत होते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. तसेच जे लोक दिवसा झोपा काढतात, असे लोक आपल्या क्षेत्रात कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत, असंही चाणक्य यांनी म्हटलं आहे.
माणसाची दिनचर्या कशी असावी – चाणक्य म्हणतात माणसाने नेहमी ब्रह्म मुहूर्तावर झोपेतून उठावं म्हणजे सूर्योदयापूर्वी मानसाने झोपेतून उठावं, जो माणूस सूर्योदयापूर्वी उठतो, तो माणूस आयुष्यात प्रगती करतो. पहाटे झोपेतून उठल्यानंतर आधी ईश्वराचं नामस्मरण करावं, त्यानंतर तुम्हाला दिवसभरात जे जे काही कामं करायची आहेत, त्याचा प्राधान्य क्रम ठरवावा आणि त्यानंतर कामाला लागावे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

