

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळच्या वेळी लोकल गाड्या उशिराने धावत असल्यामुळे चाकरमान्यांचा मनस्ताप झाला आहे. सकाळी नोकरीसाठी निघालेल्या अनेक चाकरमान्यांना त्यांच्या रोजच्या लोकल गाड्यांसाठी प्लॅटफॉर्मवर बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर विविध ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी पॉइंट्समध्ये बिघाड झाल्याने काही लोकल गाड्या उशिराने धावत आहेत.
विविध ठिकाणी तांत्रिक बिघाड
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई रोड इथं सकाळी 4.46 वाजल्यापासून DIVA डाऊन आणि अप फास्ट मार्गावरील PT 111/112 पॉइंटमध्ये बिघाड झाल्याची माहिती आहे. बिघाड दुरुस्त करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पॉइंट क्लॅम्पिंगचं काम सुरू केलं. त्यामुळे अप फास्ट लोकलच्या वाहतुकीला विलंब होत आहे. दादर इथं सकाळी 10.10 वाजता अप फास्ट आणि डाऊन फास्ट मार्गावरील पॉइंट क्रमांक 143/144 रिव्हर्सवरून नॉर्मल स्थितीत येत नसल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली.
रेल्वे कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर काम सुरू
गोरेगाव इथं सकाळी 10.22 वाजता अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील पॉइंट क्रमांक 127/128 आणि 129/130 मध्ये बिघाड झाला. बिघाड दुरुस्त करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. लोकल सेवा लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी कर्मचारी प्रयत्न करत आहेत. या बिघाडामुळे पश्चिम रेल्वेच्या गाड्या गोरेगाव आणि अंधेरी स्थानकांदरम्यान उशिराने धावत आहेत. यामुळे प्लॅटफॉर्मवर आणि लोकल गाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच लोकलचं वेळापत्रक कोलमडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
सध्याचे अपडेट्स
सध्या पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक 40 ते 45 मिनिटं उशिराने सुरू आहे. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. काही जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. या गोंधळामुळे चाकरमान्यांना ‘लेट मार्क’चा फटका सहन करावा लागत आहे. तांत्रिक बिघाड लवकरात लवकर दुरूस्त करून वाहतूक सुरळीत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

