

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे रायगड दौऱ्यावर आहेत. ते मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करत आहेत. त्यांचा ताफा या महामार्गावरून जात आहे. यावेळी महामार्गाच्या कामाची पाहणी ते करतील. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. हा महामार्ग आणि तिसऱ्या मुंबईवरून सरकारवर निशाणा साधला. त्यांनी कोकणमधील विकास प्रकल्पांचा स्थानिकांना काय फायदा झाला? असा सवाल केला. तर कोकणातील मुला-मुलींना किती नोकऱ्या लागल्या असा सवाल केला. त्यांनी महामार्ग विकासासाठी नाही तर टक्केवारीसाठी होत असल्याची जळजळीत प्रतिक्रिया दिली.
टक्केवारीसाठी विकास
मागे मी एकदा नितीन गडकरी यांना फोन केला होता. त्यांना विचारलं होतं. कंत्राटदार कंटाळून निघून गेले असे ते म्हणाले होते. आता गडकरी हे या रस्ते वाहतूक आणि विकास मंत्री आहेत आणि ते जर कंत्राटदार कंटाळून निघून गेले असे म्हणत असतील. कंत्राटदार कोणामुळे आणि कशामुळे कंटाळलेत? आतापर्यंतचा रिवाज असा आहे की, रस्ता जर बांधायचा असेल तर भूसंपादन सरकारने करून घ्यायचे असते. मग पुढे कंत्राटदार रस्ते करतो. या ठिकाणी एक गोष्ट ठरलेली आहे. जागा संपादित केलेली नाही. कंत्राटदाराला कंत्राट देऊन सरकार मोकळे झाले. पैसे दिलेले आहे. पैशातून त्यांचे टक्के गेलेले आहेत. रस्ता तिकडेच आहे. वर्षानुवर्षे हेच होत आहे. नवीन बांधलेल्या रस्त्याची हीच परिस्थिती आहे. बनवलेला रस्ता खराब होणार असेल तर दोन किलोमीटरच्या रस्त्याने काय होईल? हे माझं राज्य आहे, माझ्या राज्यातील काम चांगलं व्हायला हवं याच्या दृष्टीने विचार न करता यामधून किती टक्के मिळतील. आमच्या जमिनी कशा विकल्या जातील, हेच व्यवहार सुरू आहे. हेच सुरू आहे महाराष्ट्रात.
तिसऱ्या मुंबईचा स्थानिकांना काय फायदा?
तिसऱ्या मुंबईचे हे आणले आहे. तिसरी मुंबई, दुसरी मुंबई काय सुरू आहे. तिसऱ्या मुंबईत, एज्युकेशनल सिटी, मेडिकल सिटी स्पोर्ट सिटी, डेटा सेंटर, संशोधन संस्था, व्यावसायिक सेंटर, आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, जागतिक तंत्रज्ञान कंपन्या आणि सेवा उद्योगांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तिसऱ्या मुंबईत काय आणायचे हे महाराष्ट्राला माहिती आहे का हो? राज्यातील मुलं मुली तयार आहेत का यासाठी? आपल्याकडील जो शेतकरी आहे, तो माजी जमीन मालक इतकं राहणार का? त्याच्यासमोर तिसरी मुंबई उभी राहणार. तो फक्त बघत राहणार. पेण, पनवेल वा रायगड जिल्ह्यातील मुला-मुलींना काही कौशल्य देणार आहोत का आपण? की परत बाहेरच्या राज्यातील मुलं मुली येणार? आज जी पुण्याची वाट लागली आहे. इतर शहरांची वाट लागत आहे. बाहेरच्या राज्यात कळतंय की काय होणार ते, ते त्यादृष्टीने त्यांच्या मुला मुलींना तयार करत आहेत. महाराष्ट्रात त्यांना पाठवलं जातं. पण आपल्याकडील मुला-मुलींना याची माहिती नाही. शहरं उभी करायची आणि वाट लावायची. जमिनी विकणे एवढाच एक धंदा सुरू आहे महाराष्ट्रात सध्या. कोकणात तर हा प्रकार सर्वाधिक सुरू आहे. कोकणाची परिस्थिती पाहिली तर आता विकास नको अशी म्हणायची वेळ आली आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
विकासात स्थानिकांचा काय वाटा?
विकासात स्थानिक लोकांचा वाटाच नसेल तर फायदा काय? स्थानिकांच्या जीवावरती या गोष्टी करायच्या आणि त्यांना उद्धवस्त करायचं. प्रकल्पासाठी जमीन देणारा मालक पुढे काय करेल? त्याची मुलं मुली काय करतील? आमची जमीन, आमचं पाणी, आमची वीज आणि पोसले कोण जाणार बाहेरचे? अशी सणसणीत चपराक राज ठाकरे यांनी लगावली. इथल्या मुला-मुलींची प्रगती होणार नसेल तर काय चाटायची ती प्रगती? हे कोणासाठी सुरू आहे. आमदार जमिनी घेतील, तुकडे पाडतील हेच सुरू आहे. आपण आपली पत्रकार परिषद घेत बसू, हेच सुरू आहे, अशी परखड टीका राज ठाकरे यांनी केली.
स्थानिकांना ही गोष्ट समजणे आवश्यक आहे. त्यांनी विरोध करणे आवश्यक आहे. सगळीकडे एकच तटकरे तटकरे, त्यांची मुलगी, ठाकूर ,त्यांचा मुलगा हेच सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर पैसे घ्यायचे. आमदार-खासदार निवडून येत नाही. तुमच्या पायाखालच्या जमीन विकल्या जाणार. महाराष्ट्र असाच विकल्या जाणार, अशी टीका मनसे अध्यक्षांनी केली. यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली. हे काय पालकमंत्र्यांचं काम आहे का? असा परखड सवाल त्यांनी विचारला.

